मुंबई डब्बावाला असोसिएशनचे (Mumbai Dabbawala Association) अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांना घाटकोपर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केले. कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याविरूध्द डब्बावाला संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. सांगितले जात आहे की 5 वर्षांपूर्वी सुभाष यांनी फसवून सायकलवरून जाणाऱ्या डब्बेवाल्यांकडून फॉर्मवर सही घेतली होती. आता या लोकांना हे समजले आहे की त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस आली आहे.
घाटकोपर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनूर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील एका गावातून आरोपी सुभाष तळेकर यांना पकडले आणि मंगळवारी पहाटे त्यांना मुंबईत आणले गेले. आज त्यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार होते. कथित कर्जाच्या घोटाळ्यात तळेकर यांच्याशिवाय आणखी एक साथीदार, विठ्ठल सावंत फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांनी फेब्रुवारी 2020 मध्ये तळेकर आणि दुसर्या संघटनेच्या दोन अन्य पदाधिकाऱ्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
हे प्रकरण 2015 साली सुरू झाले, जेव्हा सुभाष तळेकर आणि इतर आरोपींनी सायकल वरून जाणाऱ्या डब्बेवाल्यांना मोफत स्कूटरचे आमिष दाखवले. यासाठी त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले व काही कागदपत्रेही घेण्यात आली. परंतु बराच कालावधी लोटला तरी त्यांना स्कूटर दिली गेली नाही. त्यानंतर या डब्बेवाल्यांच्याकडे कर्जाबाबत नोटीस येऊ लागली. घेतलेले कर्ज परत केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या डब्बेवाल्यांनी हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत नेले आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक; उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल)
दरम्यान, तळेकर हे यापूर्वी मुंबई जीवन डब्बे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते होते, ज्यांच्या सदस्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होता. फसवणूक उघडकीस आल्यानंतर तळेकर यांना पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुंबई डब्बावाला असोसिएशनची स्थापना केली आणि ते प्रमुख झाले.