राज्यातील कोविड-19 (Covid-19) च्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या कालावधीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्यातील काही मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, उद्या होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबतही (Free Vaccination) निर्णय घेतला जाऊ शकतो. उद्या (बुधवार, 28 एप्रिल) दुपारी 12.30 वाजता ही बैठक होणार आहे.
विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर 22 एप्रिलपासून अधिक कठोर निर्बंध 15 दिवसांसाठी लागू करण्यात आले. मात्र अद्याप कोरोना रुग्णवाढीत विशेष घट पाहायला मिळत नसल्याने धोका टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढण्यात येण्याची शक्यता मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ही लस मोफत दिले जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले असले तरी याबाबतचा निर्णय उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (COVID 19 Vaccine Global Tender काढण्याची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात- राजेश टोपे)
दरम्यान, राज्यातील झपाट्याने वाढणारी कोविड-19 रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान या पार्श्वभूमीवर सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर लस मोफत देऊन राज्य सरकार नागरिकांना दिलासा देणार का, हे देखील बैठकीनंतर स्पष्ट होईल.