कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामध्ये देशात अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आले. या दरम्यान अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले व ज्याचा थेट परिणाम रिएल इस्टेट क्षेत्रावरही झाला. या क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी 26 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क (Stamp Duty) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक नकारात्मक बातमी आहे. मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सवलत 31 डिसेंबपर्यंतच राहणार असून, नवीन वर्षांत मुद्रांक शुल्क एक टक्याने वाढणार आहे.
लॉक डाऊनच्या काळात रिएल इस्टेट क्षेत्राशी लोकांनी फारकत घेतली होती. घरे व मालमत्तांच्या खरेदी-विक्री पुन्हा व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये मुंबईत 3 टक्के आणि राज्यात इतर ठिकाणी दोन टक्के सवलत दिली होती. मात्र आता ही सवलत 31 डिसेंबर पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर यामध्ये 1 टक्का वाढ होईल. महसूल विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात घर खरेदी करणाऱ्या लोकांना आशा होती की सरकार मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्चपर्यंत वाढवू शकेल, पण तसे झाले नाही. राज्य सरकारने फ्लॅट खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची ही सवलत मार्च 2021 पर्यंत ठेवली असती तर घर खरेदीमध्ये अजून तेजी दिसून आली असती. रिएल इस्टेट क्षेत्रासह घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना याचा फायदा झाला असता, मात्र तसे झाले नाही. (हेही वाचा: मुद्रांक शुल्क सवलत, नागरिकांची गर्दी वाढली; सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये सुरु)
दरम्यान सरकारने मुद्रांक शुल्कात घट केल्याने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात अब्जावधी रुपयांचे मालमत्ता व्यवहार नोंदविले गेले. करोना असूनही ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मालमत्ता व्यवहार नोंदविले गेले. मुंबईमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये 9,301 इतक्या युनिट्सची विक्री नोंदवली गेली.