सध्या मुंबईमध्ये (Mumbai) लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, बस, रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर असे अनेक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. तरी मुंबईमध्ये ट्रफिकची समस्या आणि एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी लागणारा वेळ यामध्ये काही बदल झाला नाही. हीच समस्या ओळखून आता यामध्ये वॉटरटॅक्सी (Water Taxi) म्हणजेच पाण्यावर धावणाऱ्या टॅक्सींचा समावेश होणार आहे. यामुळे आता एक ते दीड तासाचा प्रवास हा फक्त अर्ध्या तासात होणार आहे. सध्या या टॅक्सी दक्षिण मुंबई ते ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), अलिबाग अशा धावणार आहेत.
महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्ड (MMB), सिडको, मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT), वाहतूक विभाग आणि जेएनपीटी यांनी तब्बल 5 कोटी रुपयांना एक अशा 5 टॅक्सी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या टॅक्सींमुळे प्रवाशांचा प्रवास वेळ तब्बल 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. एकाचवेळी कमीतकमी 20 लोक या टॅक्सीमधून प्रवास करू शकणार आहेत. निविदा काढण्याआधी या टॅक्सींचे मार्ग, खोली, सुरक्षितता इत्यादी घटकांचा विचार केला जाईल. सर्व काही सुरळीत पार पडले तर साधारण ऑक्टोबरपासून या टॅक्सी प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील.
(हेही वाचा: मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार)
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, ही सेवा एमबीपीटीचे क्रूझ टर्मिनल ते अलिबाग, ठाणे आणि बेलापूरजवळ मांडवा अशी चालविली जाईल. या प्रवासासाठी 30 मिनिटे इतका वेळ लागणार आहे. सोबतच ठाणे, ऐरोली, वाशी, नेरूळ, बेलापूर, पनवेलचे आगामी विमानतळ, जेएनपीटी, करंज आणि कान्होजी अंगरे या ठिकाणांचाही समावेश आहे. रस्ते मार्गासाठी जितका दर आकाराला जातो तितकाच दर या टॅक्सीसाठी आकाराला जाणार आहे.