राज्यात उन्हाळ्याला सुरुवात सुरु झाल्यानंतर चिमुरड्यांना शाळेला सुट्ट्या या सुरु होतात. यामुळे उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे आरक्षण मिळत नाही. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनेक गाड्या सुरु केल्या आहे. पुणे, मुंबईतून या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची सोय केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेलीदरम्यान 24 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. (हेही वाचा - Central Railway Mega Block Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक; पहा वेळापत्रक)
मुंबईतून विशेष रेल्वेच्या फेऱ्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून एलटीटी – कोच्चुवेली साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01463 ही 11 एप्रिल रोजी ते 27 जूनदरम्यान दर गुरुवारी एलटीटीवरून सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8.45 वाजता कोच्चुवेली येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01464 साप्ताहिक विशेष कोच्चुवेली 13 एप्रिल ते 29 जूनदरम्यान दर शनिवारी सायंकाळी 4.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.50 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळूरु, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा दिला जाईल. या विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, 2 वातानुकूलित-द्वितीय श्रेणी, 6 वातानुकूलित-तृतीय श्रेणी, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
पुणे-नागपूर , पुणे-दानापूर , पुणे-हजरत नुजामुद्दीन या मार्गावर 70 ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पुणे ते नागपूर दरम्यान 38 विशेष गाड्या आहेत. दानापुरसाठी 8 तर हजरत निजामुद्दीन साथी 24 गाड्या सोडल्या जाणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात गैरसोय टाळण्यासाठी गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.