Chhagan Bhujbal (Photo Credit: ANI)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सध्या महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून (Maharashtra Sadan Scam) दोषमुक्त केले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा मुलगा पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) आणि पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनाही क्लिन चीट दिली आहे. एकूण सहा दोषमुक्तांमध्ये तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांची देखील नावं आहेत. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(Anti Corruption Bureau) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता त्यावर आज सुनावणी झाली आहे.

भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी पैसे मिळाले होते याचा पुरावा असल्याचा दावा एसीबीतर्फे करण्यात आला होता. मात्र आता सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणामध्ये 2 वर्ष भुजबळ तुरूंगात होते.

Live Law Tweet 

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 साली गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जूनला ईडीनेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये गुन्हे दाखल केले होते. दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता.

दरम्यान या सुनावणीनंतर आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितले आहे.