लवकरच ठाणे-बोरीवली प्रवास होणार अवघ्या 15 मिनिटांचा; तयार होत आहे भूमिगत मार्ग, जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MMRDC) नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (PWD Minister Eknath Shinde) यांच्या देखरेखीखाली ठाणे आणि बोरिवलीला (Thane-Borivali) जोडणारा भूमिगत रस्ता तयार करण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 11,235.43 कोटी रुपये आहे. ठाणे-बोरिवलीला जोडणाऱ्या या दुहेरी बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद गतीने घडेल, तसेच घोडबंदर रोडवरील सध्याची रहदारी कमी होण्यास मदत होईल. या मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्क खाली दोन 10.25 किमी लांबीच्या तीन-लेन बोगद्यासह 11.8 किमी लांबीचा रस्ता जोडला जाईल, जो ठाण्यातील टिकुजी वाडी ते बोरिवलीतील पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत जाईल.

हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार असल्याने, उद्यानाच्या जैवविविधतेचे नुकसान होऊ नये यासाठी एमएसआरडीसीने विशेष खबरदारी घेतली आहे. उद्यानामधील प्राण्यांना समस्या उद्भवू नये म्हणून, बोगद्यासाठी खास यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामुळे उद्यानाच्या जैवविविधतेचे नुकसान होणार नाही.

या मार्गावर दर 300 मीटर अंतरावर क्रॉस बोगदे असतील आणि या रचनेमुळे वाहनांना ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करता येईल. 60 मिनिटांचा प्रवासाचा कालावधी 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी केला जाईल, ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि इंधनाचा वापर 10.5 लाख मेट्रिक टन कमी होईल. या उपक्रमामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनात 36 टक्के घट होईल, यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांचे महत्वाचे वक्तव्य)

ठाणे-बोरिवली भूमिगत बोगद्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR)) संपला असून, भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रकल्पाला पर्यावरणाच्या मंजुरीच्या आवश्यकतेमधून सूट देण्यात आली आहे. ठाणे-बोरिवली बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 16.54 हेक्टर खासगी जमीन आणि 40.46 हेक्टर जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. मार्च 2022 मध्ये सुरू होणाऱ्या या प्रकल्पाला साडेपाच वर्षे लागतील.