उंच इमारतींच्या (High Rise Building ) वरच्या मजल्यांवर आग विझवणं आणि वेळीच मदत पुरवणं हे अग्निशमन दलासाठी आव्हानात्मक असतं. मात्र आता आगीचं नेमकं काय स्वरूप आहे? हे ओळखण्यासाठी अग्निशमन दलाला ड्रोन (Drone) सेवा मदत करणार आहे. या सेवेच्या पायलट प्रोजेक्टसाठी एक ड्रोन मुंबई अग्निशमनदलाच्या (Fire Brigade Department) ताफ्यामध्ये येणार आहे.
पोलिस आणि सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीकडून परवानगी मिळाल्यानंतर ड्रोन सेवा अग्निशमन दलाला मिळणार आहे. ड्रोनच्या मदतीने इमारतींच्या उंच भागावरील आगीचा अंदाज घेणं सुकर होणार आहे. तसेच यामुळे नेमकी तिथापर्यंत मदत कशी पोहचवायची याचा अचूक प्लॅन बनवताना मदत होईल. टोलेजंग इमारतींवर आग लागल्यानंतर वरपर्यंत थेट पोहचता येईल अशा शिड्या नाहीत त्यामुळे मदत पोहचवताना उशिर होतो.
एका वृत्तपत्राला माहिती देताना अग्निशमनदलाच्या ऑफिसरने सांगितल्यानुसार, ' ड्रोन सेवेबाबत अजूनही प्रोजेक्ट मॉडेल बनवण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. काही वेंडर्ससोबत याबाबत बातचीत सुरू आहे. एका ड्रोनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर मुंबईतील सहा अन्य केंद्रांवर ही सुविधा दिली जाणार आहे.