मनसेचा खळळ खट्याक! लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची केली तोडफोड; Watch Video
MNS Protest (Photo Credits: ANI)

लातूरच्या शेतक-यांवर आलेल्या दुबार पेरणीच्या संकटाची कृषी विभागाने दखल न घेतल्याने   मनसैनिकांनी या विभागाला 'खळळ खट्याक' चा दणका दिला आहे. लातूरच्या (Latur) हजारो शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली होती. मात्र लातूरच्या कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेने लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड केली. खरीपातील सोयाबीनचं बियाणं वांझोटं निघाल्याच्या लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. यावरुन मनसेच्या  स्थानिक कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी मनसैनिकांनी मनसे (MNS) स्टाईलने कृषी विभागाला दणका दिला आहे.

शेतक-यांवर आलेल्या दुबार पेरणीच्या संकटामुळे कृषी विभागाने या शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. मात्र लातूरच्या कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेने हे आंदोलन केल्याचे मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ:

या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन हजार तक्रारी महाबीजच्या विरोधात असूनही, एकही गुन्हा लातूरमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे दोषी कंपन्यांसह महाबीजवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी. अनेकदा निवेदनं देऊनही सरकार काहीही करत नसल्यामुळे झोपलेल्या कृषी विभागाला जागं करण्यासाठी हे आंदोलन केलं असल्याचं, मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितलं.