Sindhudurg Chipi Airport Inauguration: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हकलून काढलं; नारायण राणे यांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला
Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

खोटं बोलणं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray ) यांना अजिबात आवडत नव्हतं. जे खोटं बोलले त्यांना बाळासाहेबांनी हकलून लावलं. हे कटू असलं तरी सत्य आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना टोला लगावला. चिपी विमानतळाचे आज उद्घाटन ( Sindhudurg Chipi Airport Inauguration) झाले. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. विरोध विचारांचा असतो. विकासात विरोध करायचा नसतो. कारण ते जनतेचे काम असते. मी विकासाला विरोध करत असतो तर मी आपल्या कॉलेजला मान्यता देताना सहीच केली नसती, असेही उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना उद्देशून व्यासपीठावर म्हटले.

आपल्या खास आणि मिश्कील शैलीत भाषणाची सुरुवात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा. ज्योतिरादित्य जी मी तुमचं अभीनंदन करतो. इतकं दुर राहून मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. प्रत्येक मातीचा गुण असतो. काही मातीमध्ये अंब्याची, कधी बाभळीची उगवतात. माती ही दोन्ही झाडे जोपते. कोकणची माती निराळी आहे. कधीही न झुकणारं मस्तक बाळासाहेब ठाकरे हे कोकणमध्ये टेकवायचे. असो. बोलण्यासारखे खूप आहे. आजचा क्षण वेगळा आहे. आज कोकणात विमानसेवा सुरु होत आहे. (हेही वाचा, Sindhudurg Chipi Airport Inauguration: आदित्य ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा- नारायण राणे)

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोवा. इथे गोव्याला विरोध करण्याचा मुद्दा नाही. पण कोकणात जे आहे ते सर्वसंपन्न आहे. आज विमानतळ, उद्योग कोकणमध्ये येत आहेत. अनेक लोक कोकण, कोकणाचा विकास याबाबत तळमळीने बोलत असतात. तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे वेगळे असते. काही कामांमुळे केंद्रीय मंत्र्यांशी बोलावे लागते. मला असे जाणवते हे बोलणे अनेकदा कोरडे असते. ज्योतिराधित्य सिंधिया यात वेगळे ठरले. त्यांनी स्वत:हून याबाबत बैठक घेतली, असे उद्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

व्हिडिओ

कोकणच्या विकासाबद्दल अनेक लोक बोलले. खरं म्हणजे कोकणचं वैभव, देश आणि जगभरामध्ये पर्यटन म्हणून आपण दाखवू शकतो. यात सिंद्धुदुर्ग महत्त्वाचा आहे. मी जेव्हा एरीयल फोटोग्राफी करत होतो तेव्हा मला लक्षात आले. म्हणजे माझी माहिती अशी आहे की सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला.