मुंबई मधील सिद्धिविनायक आणि मुंबादेवी मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले; 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य
Mumba Devi Temple, Mumbai | (Photo Credit: ANI / Twitter)

कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) बंद असलेली राज्यभरातील मंदिरं, धार्मिक स्थळं उद्यापासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी कोविड-19 नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उद्या, गुरुवार, 7 ऑक्टोबर नवरात्रीचा पहिला दिवस. या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर मंदिरं भाविकांसाठी खुली होणार आहेत. उद्या मुंबईमधील सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार असून केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर भाविकांना मंदिराच्या अॅपवर बुकींग करावे लागणार आहे. याशिवाय भाविकांना मंदिरात हार, फुलं, प्रसाद, ओटी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. (Mumbai Mumba Devi Temple Reopening: मुंबा देवी मंदिरामध्ये 7 ऑक्टोबर पासून पूर्ण लसवंतांना प्रवेश सुरू; मंदिराच्या वेबसाईटवर करावं लागणार रजिस्ट्रेशन)

राज्य सरकारच्या नियमानुसार, प्रसाद वाटप, पवित्र पाणी शिंपडणे, मुर्ती किंवा पवित्र ग्रंथांना स्पर्श करणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर भाविकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. प्रार्थनास्थळांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर राखले गेले पाहिजे. याशिवाय धोका टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास मंदिरांच्या व्यवस्थापनाने भक्तांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन ठिकाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Temples to Reopen: सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबरपासून उघडणार मंदिरे; मार्गदर्शक सुचना जारी)

दरम्यान, मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा केली होती. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने कोरोना संबंधित प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी भक्त आणि प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एसओपी जारी करण्यात आली होती.