धक्कादायक! पिंपरी-चिंचवड येथील कोरोना विषाणू पॉझिटिव्ह महिलेचा प्रताप; होम क्वारंटाईन असूनही पुण्याहून विमानाने दुबईत पलायन, गुन्हा दाखल
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे आता नागरिक व प्रशासन अशा दोहोंकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र पुण्यात (Pune) एक 30 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली असूनही, या महिलेने पुण्याहून दुबईला (Dubai) प्रवास केला आहे. महत्वाचे म्हणजे या प्रवासाबाबत अतिशय गुप्तता पळून कोणालाही कल्पना न देता महिलेने या प्रताप केला आहे. आता याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दुबई येथून काही कामानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे आली होती. त्यानंतर लॉक डाऊन सुरु झाल्याने या महिलेला परत दुबईला जाता आले नाही. उच्चभ्रू अशा पुनावळे परिसरात इंद्रमेघ या सोसायटीमध्ये ही महिला राहत होती. काही काळाने तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली त्यामुळे शनिवारी 11 जुलैला या महिलेने पिंपरी-चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी 12 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही लक्षणे सौम्य असल्याने, या महिलेला घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते.

होम क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचा असतो, मात्र सहा दिवसानंतर 17 जुलै रोजी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला खोटे नाव सांगून मेडिकलमध्ये जाऊन येते असे सांगून ही महिला घराबाहेर पडली. त्यानंतर तिने तडक दुबईला पलायन केले. महत्वाचे म्हणजे, दुबईला पोहोचल्यानंतर शारजाह विमानतळावरुन तिने सोसायटी सदस्यांना मेसेज केला की आपण दुबईला पोहोचलो आहोत व शारजाह विमानतळावर आपली चाचणी नकारात्मक आली आहे. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, सोमवारी रात्री डॉ. अमित आबासाहेब माने यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर साथीने रोग प्रतिबंध कायद्यांतर्गत या महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हायरस लसीच्या चाचण्यांनी दाखवले सकारात्मक परिणाम; Safe, Well-Tolerated आणि Immunogenic असल्याचा दावा)

दरम्यान, काल पिंपरी-चिंचवडमध्ये 987 जणांना कोरोना विषाणू लागण झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11, 494 वर पोहोचला आहे.