भाजप, देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा सवाल; बहुमत होते तर,'ऑपरेशन लोटस'च्या नावाने चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली?
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Government Formation: देवेंद्र फडणीस यांच्याकडे बहुमत होते तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली? नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळाची उपमा त्या सर्व प्रकारास दिली. आम्हीही त्यांना सांगतो की, कितीही 'फिक्सिंग' झाले तरी 'सत्तमेव जयते' या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही. बहुमत सिद्ध होईल तेव्हा सत्य चिंकल्याचा आनंत महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे.

शिवसेना पक्षाचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या 'सामना' या दैनिकात लिहिलेल्या संपादकीय लेखात ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठांचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या निर्मितीत या मंडळींनी रक्ताचा सोडाच, पण घामाचा एक थेंबही गाळला नसल्याने हा राजकीय घोटाळा त्यांनी केला आहे'', असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदांच्या भविष्याचा आज फैसला)

आपल्या संपादकीयात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, ''शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. मग तीन पक्षांच्या आमदारांनी आपल्या सही-शिक्क्यांनिशी जे पत्र दिले, त्यावर मा. भगतसिंग राज्यपाल महोदयांची काय भूमिका आहे? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “महाराष्ट्रात जे घडले ती ‘चाणक्य–चतुराई’ किंवा ‘कोश्यारीसाहेबांची होशियारी’ असे म्हणणे हे सर्वस्वी चूक आहे. आमदारांचे अपहरण करणे व दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती?,” असा प्रश्न विचारत खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचाने अत्युच्च टोक गाठले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. हा संघर्ष आता कोणते वळण घेणार. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या विकासावर, प्रशासकिय कामांवर नेमका काय परिणाम होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.