
Surgical Stike2: 'पाकिस्तानचे जगाच्या नकाशावरील अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय विश्वशांती लाभणार नाही. पाकिस्तानसारखी राष्ट्रे ही फक्त हिंदुस्थानलाच नाही तर जगाला धोकादायक ठरली आहेत. पाकिस्तानात (Pakistan) लोकशाही नाही. त्यामुळे नागरी सरकारे व पंतप्रधानांच्या आडून एक प्रकारे लष्करशहाच सत्ता उपभोगत असतात. पुन्हा हिंदुस्थानशी भांडण संपले तर पाकचे सैन्य बेकार होईल. त्यामुळे पोटापाण्याचे उद्योग म्हणून हिंदुस्थानशी सततचे युद्ध सुरू ठेवले जाते. अशा सैतानी डोक्याचे लोक एखादा देश चालवीत असतील तर त्यांच्याशी शांतीवार्ता होणे अवघड ठरते', असे शिवसेना (Shiv Sena Party Chief) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दै. सामनातून जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, मुखपत्रातून 'शौर्याला सलाम!' नावाचा लेख लिहून जवानांचे कौतूक करत असतानाच या कारवाईचे आणि पुलवामातील बलिदानाचे राजकारण होऊ नये, अशी आपेक्षाही व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढवय्यांनी कमाल केली आहे. त्यांच्या या शौर्यामळे देशभरातच देशभक्तीचा एक माहोल निर्माण होणे, त्याचा जल्लोष केला जाणे या गोष्टी अनपेक्षित नाहीत. तसा तो देशभरात केलाही जात आहे. फक्त अपेक्षा इतकीच या कारवाईचे आणि पुलवामातील बलिदानाचे राजकारण होऊ नये. कारण कारवाई सैनिकांची आहे. हे यश पूर्णपणे बहादूर सैनिकांचे आहे. सैन्याच्या शौर्याला सलाम!' (हेही वाचा, Surgical Strike 2: पाकिस्तानात वायुसेनेने केलेल्या हल्ल्याची ठिकाणे Google Map वरुन पाहा)
दरम्यान, ' इंदिरा गांधी यांनी 1971 साली सगळ्यात मोठी सैन्य कारवाई करून पाकिस्तानचे दोन तुकडेच केले. ‘लातों के भूत बातों से नही मानते’ हीच इंदिरा गांधींची धारणा होती व इंदिरा गांधींनी पाकिस्तानात फौजा घुसवून त्यांना गुडघे टेकायला लावले. हिंदुस्थानी सैन्याचा हा शौर्य इतिहास आहे व तो इंदिरा गांधी यांच्या काळात घडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली असाच शौर्य इतिहास नव्याने घडेल व त्याची सुरुवात झाली आहे', असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.