शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार- संजय राऊत
Sanjay Raut (PC - ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध सर्व देशाचा सुरु असलेला लढा हा खरच कौतुकास्पद आहे. मात्र लॉकडाऊन (Lockdown) झाल्यामुळे पोटाची खळगी भरणा-या लोकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने औषधांमध्ये कशाची कमतरता येऊ नये म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटच्या माध्यमातून मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदार 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे.

महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून ही स्थिती संपूर्ण देशासाठी खूप चिंताजनक आहे. आपण सध्या कोरोनाच्या सावटाखाली असून या संकटाला सर्वांनी मिळून सामोरे गेले पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध जिंकण्यासाठी खारीचा वाटा उचलून शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी हा निर्णय घेतल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. Coronavirus: महाराष्ट्रातील 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश

पाहा संजय राऊत यांचे ट्विट:

हेदेखील वाचा- Coronavirus: सर्व जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची व किराणा दुकाने 24 तास सुरु राहणार- सीएम उद्धव ठाकरे

भारतात आतापर्यंत 694 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 43 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 130 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.

सध्याच्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टीच सुरु राहणार आहेत. या दरम्यान नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Balasaheb Thackeray) यांनी याबाबत घोषणा केली.