मुंबई: दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. २०१९ च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धाव ठाकरे यांनी लिहिलेल्या लेखात ही टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. २०१९ च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. आंबेडकर-ओवेसी अधिकृतपणे एकत्र आल्यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम संपला. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून २०१९ सालात भाजपास मदत करतील. त्या दोघांचे एकत्र येणे हे हिंदुस्थानच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे.
प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच खरा चेहरा उघड झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून दलित जनतेने जे भव्य स्वप्न पाहिले ते प्रकाश आंबेडकर पूर्ण करू शकले नाहीत. ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे. त्यामुळे दलदल वाढली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.