Saamna and Owaisi (Photo Credits: Twitter/Facebook)

अयोध्या राममंदिर भूमीपूजनाच्या (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) सोहळ्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 5 ऑगस्टला या भूमीपूजनामध्ये चांदीची वीट ठेवून पायाभरणी करण्यात आली. मात्र यावर MIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानाचा खरपूस समाचार घेत शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) ओवेसींवर सडकून टीका केली आहे. काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत, असं म्हणत शिवसेनेनं ओवेसी यांच्या वक्तव्याच्या समाचार घेतला.

अयोध्येत 5 ऑगस्टला झालेल्या राममंदिर भूमिपूजनानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “अयोध्येत पंतप्रधान जसे भावनिक झाले तसा मीदेखील भावनिक झालो आहे,” असं ओवेसी म्हणाले होते. ‘बाबर जिंदा है। जिंदा रहेगा।’’ ओवेसी यांनी ही जी बांग दिली ते त्यांचे ‘स्वगत’ आहे. या स्वगताचे देशातील मुसलमान बांधवांनी स्वागत केले नाही, असं म्हणत शिवसेनेनं ओवेसी यांना सामनाच्या अग्रलेखातून धारेवर धरलं आहे.

हेदेखील वाचा- मनसे आक्रमक; असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांची संतप्त प्रतिक्रिया

पाहा काय म्हटलयं अग्रलेखात?

मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ओवेसी हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी आणखी एका मुद्द्यावर बांग दिली आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही.

ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही. मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अयोध्येतील भूमिपूजन हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे शल्य ओवेसी यांनी बोलून दाखवले. हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर करणे ही लोकशाहीच आहे. त्या भावनांचा आदर करून राममंदिर उभे करणे यात निधर्मीवादाचा पराभव असल्याचे ओवेसी यांना वाटते. पाकिस्तानातील काही नेत्यांनादेखील तसेच वाटते.

ओवेसी म्हणतात, मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. श्रीमान ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते. हिंदू धर्माचे स्वतःचे वेगळे ‘शरीयत’ नाही व इतर धर्मीयांना तो ‘काफर’ समजत नाही. राममंदिर हे त्याच संविधानाचे राष्ट्रीय प्रतीक आहे.