Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत एकनाथ शिंदे गोटातूनही नाराजी दिसून येत आहे. पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांना अन्य ठिकाणी पाठवण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करताना, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हटले होते. आता नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असे ते म्हणाले होते. औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले.

यानंतर आता बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, कोश्यारी यांनी मराठा साम्राज्याच्या संस्थापकाबाबत यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कधीच जुने होत नाहीत आणि त्यांची जगातील कोणत्याही महान व्यक्तीशी तुलना होऊ शकत नाही, हे राज्यपालांनी समजून घेतले पाहिजे. राज्याचा इतिहास माहीत नसलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवून काही उपयोग नाही, अशा व्यक्तीला अन्यत्र पाठवावे, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली.

राज्यपालांच्या या विधानावर आमदार गायकवाड यांनी इशारा दिला की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगले नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे दोघानांही परिणाम भोगावे लागतील. कोश्यारी यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही जोरदार टीका केली आहे. (हेही वाचा: भगतसिंह कोश्यारींच्या त्या वक्तव्यावर राजे संतापले, उदयनराजेंनी राज्यपालांची थेट लायकीचं काढली तर संभाजीराजेंकडून माफीनाम्याची मागणी)

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पुण्यात निदर्शने केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली.