महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने (MSRTC) बोरीवली-ठाणे-पुणे मार्गावर या वर्षाच्या अखेरीस 'शिवाई' इलेक्ट्रिक बसेस (Shivai Electric Buses) सुरु करण्याची योजना आखली आहे. महामंडळ या मार्गावर या बसच्या साधारण 100 ट्रिप सुरू करणार आहे. दोन्ही शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन तसेच देखभाल व दुरुस्ती वर्कशॉप उभारण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. एमएसआरटीसीने 1 जून रोजी पुणे ते अहमदनगर दरम्यान पहिली शिवाई ई-बस सेवा सुरू केली होती.
शिवाई ही एमएसआरटीसीची वातानुकूलित ई-बस, दोन शहरांमधील सुमारे 180 किमी अंतर सुमारे चार तासांत कापेल या बसेसचा कमाल वेग ताशी 80 किमी आहे. सध्या मुंबई-पुणे दरम्यान शिवनेरी बससेवेच्या 158 फेऱ्या सुरू आहेत. शिवनेरीने दररोज सरासरी 3,300 प्रवासी प्रवास करतात. त्याचप्रमाणे ठाणे ते पुणे दरम्यान शिवनेरीच्या 18 फेऱ्या धावतात. या प्रिमियम सेवेचे दररोज सरासरी 500 प्रवासी आहेत.
ई-शिवाई बसेसच्या योजनेबद्दल माहिती देताना, एमएसआरटीसी अधिकारी म्हणाले, ‘मुंबई आणि पुणे दरम्यानच्या बहुतांश शिवनेरी बस सेवा हळूहळू शिवाईने बदलल्या जातील. पहिल्या टप्प्यात या वर्षाच्या अखेरीस पुणे, बोरीवली आणि ठाणे दरम्यानच्या मार्गांवर ही सेवा सुरू केली जाईल. सध्याचा शिवनेरी ताफा इतर मार्गांवर तैनात केला जाईल.’ पूर्ण चार्ज झालेली शिवाई एकाच वेळी 300 किमी धावू शकते. 322KV बॅटरी असलेल्या वाहनाची बॅटरी पूर्णपणे संपली तर त्यांना पूर्णपणे रिचार्ज होण्यासाठी तीन तास लागतील. (हेही वाचा: Supreme Court: विकासकाला भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर बांधलेले फ्लॅट हस्तांतरित करण्यासाठी NOC आवश्यक नाही: उच्च न्यायालय)
एमएसआरटीसीच्या ताफ्यात सुमारे 16,000 बस आहेत. महामंडळाने 700 नॉन-एसी बसेस आणि 150 एसी इलेक्ट्रिक काउंटरपार्ट्सच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. 150 बसेसपैकी 100 मुंबई-पुणे मार्गावर तर उर्वरित राज्यांच्या इतर शहरांतर्गत मार्गांवर सुरू केल्या जातील. ‘केंद्र सरकारच्या फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME) योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने 1,000 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत.