मुख्यमंत्री,‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून ‘सामना’ वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. ‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारडय़ांचा आरसा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. तसेच, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांकडू सातत्याने केल्या जाणाऱ्या विधानांबाबत, 'आम्ही काय करायचे, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू. चकव्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही' असे सांगत खोचक टोलाही उद्धव यांनी भाजपास लगावला आहे.
भाजपला राज्यातील सत्तेवर तर, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर येऊ चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आयोजित विविध कार्यक्रमास हजेरी लावत आहेत. भाजपच्या नेत्यांकडूनही मुलाखतींचा बार उडवून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर प्रसारमाध्यमांकडून मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांना प्रसारमाध्यमांकडून २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांबाबत प्रश्न विचारले जात आहेत. यावर शिवसेनेसोबत युती होणारच असे भाजपकडील अनेक नेते परस्परच सांगून टाकत आहेत. एका खासगी वृत्तवाहिणीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नुकतीच शिवसेना-भाजप युतीबाबत भूमिका मांडली. तसेच, शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्य जाणाऱ्या दै. सामनातून वेळोवेळी राज्यसरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ‘‘सरकार ‘सामना’ चालवत नाही, मी चालवतो’’असे विधान केले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामनातून लिहिलेल्या लेखात मुख्यमंत्र्यांवर आपल्या खास शौलीत हल्ला चढवला आहे. (हेही वाचा, 'देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का?')
दै. सामनात लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे लिहितात, महाराष्ट्राचे चकचकीत आणि टकटकीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा महिमा काय वर्णावा? तो अद्भुतच आहे. त्यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाली. त्यामुळे प्रथा-परंपरेनुसार त्यांनी मुलाखती वगैरे देऊन आपले मन मोकळे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चार वर्षांत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर नेले. पहिला क्रमांक त्यांनी नेमका कोणत्या विषयात मिळवला? महागाई, बेरोजगारी, ढिसाळ कारभार की आणखी कशात? चार वर्षे होत असताना शिवस्मारकाच्या पायाभरणीस निघालेली बोट बुडाली. हा काही शुभ संकेत नाही. कुपोषणाचा आकडा महाराष्ट्रात वाढतोच आहे. भीमा-कोरेगाव दंगल, मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे या सामाजिक अशांततेचे श्रेय कोण घेणार?.
दरम्यान, मुख्यमंत्री, ‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. श्रीमान फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! शिवसेना पक्षाच्या चाव्या नरीमन पॉइंटच्या भाजप कार्यालयात नसून लाखो कडवट शिवसैनिकांच्या हाती आहेत. आम्ही त्यांचे नेतृत्व करीत आहोत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘स्वबळा’वर लढून महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचा एक ठराव एकमताने मंजूर झाला. शिवसेनेचा ठराव म्हणजे बेडकी डराव नाही. मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना आता चौथ्या वर्षी जो शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटला आहे तो काही उगाच नाही. कारण इतरांच्या बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं असेल, पण फडणवीस व त्यांच्या सरकारसाठी पाचवं वरीस धोक्याचं ठरेल असा माहौल स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही काय करायचे, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू. चकव्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही, असेही ठाकरे यांनी सामनातील लेखात म्हटले आहे.