Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

पहलगाम हल्ल्यानंतर, 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरुद्ध लढण्याचा भारताचा संकल्प सादर करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली जाणार आहेत. याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. मात्र याआधी शिवसेना- यूबीटीने (Shiv Sena-UBT) या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. आता सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या रवाना होण्यापूर्वी, केंद्राने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

या फोनकॉलनंतर शिवसेनेने (यूबीटी) मंगळवारी म्हटले की, पक्ष ‘राष्ट्रीय हितासाठी’ दहशतवादाविरुद्ध भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेला पाठिंबा देईल. ‘अराजकता आणि गैरव्यवस्थापन’ टाळण्यासाठी केंद्राने या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना माहिती देण्याच्या प्रोटोकॉलचे पालन करावे, असेही सेनेने (यूबीटी) म्हटले आहे. पक्षाच्या राज्यसभा सदस्या प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसोबत शिष्टमंडळांचा भाग असतील.

शिवसेनेचा (यूबीटी) सर्वपक्षीय शिष्टमंडळांना पाठिंबा: 

शिवसेना (यूबीटी)ने याबाबत म्हटले आहे, ‘देशाच्या शत्रूंविरूद्ध आम्ही सर्व एक आहोत, आणि म्हणूनच भारताचं प्रतिनिधी मंडळ विविध देशांना भेट देत आहे त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सहभाग असेल. या प्रतिनिधी मंडळाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री मा. किरेन रिजिजू जी यांनी काल पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेबांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. हे प्रतिनिधी मंडळ ‘आतंकवादाविरोधात भारत’ या उद्दिष्टासाठी असून, राजकारणासाठी नाही. याची खात्री मिळाल्यानंतर, आम्ही केंद्र सरकारला हेही स्पष्ट केलं की, देशाच्या हितासाठी जे योग्य आहे, ते आम्ही निश्‍चित करू.’ (हेही वाचा: Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको')

‘खासदार सौ. प्रियंका चतुर्वेदी या देशभरातील इतर खासदारांसोबत या प्रतिनिधी मंडळाचा भाग असतील. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या देशाच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे, विशेषतः पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांच्या विरोधात, आणि त्यांची केंद्र नष्ट करण्यासाठी. आपल्या सशस्त्र दलांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, यावर कोणतेही दुमत असू नये, हे सर्वपक्षीय मत आहे. पहलगामच्या घटनेतील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेतील अपयशाबाबत आमचं मत ठाम आहे, आणि देशाच्या हितासाठी आम्ही योग्य ते प्रश्न उपस्थित करत राहू. पण जागतिक स्तरावर पाकिस्तानप्रणीत दहशतवाद उघड करणे आणि त्याला वेगळे ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘या प्रतिनिधी मंडळांबाबत पक्षांना योग्य माहिती दिली जावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती, जेणेकरून गोंधळ आणि गैरसमज टाळता येईल. काल झालेल्या चर्चेतून सर्व शंका दूर झाल्या आणि आम्ही देशहितासाठी अशा उपक्रमांना पूर्ण पाठिंबा असल्याचं पुनः स्पष्ट केलं आहे. तसेच, पहलगाम हल्ला ते ऑपरेशन सिंदूर या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलावण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व देशप्रेमी भारतमातेच्या रक्षणासाठी पूर्णपणे एकसंघ आहोत.’