hiv Sena (UBT) Candidate List | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी (Shiv Sena (UBT) Candidate List) जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबईतील तीन जागांचा समावेश आहे. त्यासोबतच बुलढाणा, यवतमाळ, मावळ आणि सांगली येथील जागांवरील उमेदवारही जाहीर झाले आहेत. पहिल्या यादीत, अरविंद सावंत, संजय दिना चव्हाण, नरेंद्र खेडेकर, संजय देशमुख यांच्यासह चंद्रहार पाटील आणि संजोर वाघेरे यांच्या नावाचाही समावेश आहे. येथे पाहा संपूर्ण यादी.

चंद्रहार पाटील यांचे नाव उमेदवार यादीत

उल्लेखनिय असे की, सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे नाव शिवसेना (UBT) उमेदवार यादीत समाविष्ठ आहे. त्यामुळे या जागेवरचा दावा काँग्रेसने अधिकृतरित्या सोडला असा त्याचा अर्थ काढला जात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतू, खुद्द उद्धव ठाकरे यांनीच मिरज येथील सभेत चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. या जागेवरुन महाविकासआघाडीमध्येच काही फाटाफूट होते का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात होता. (हेही वाचा, Sanjay Raut on Mahayuti: 'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार गटावर टीका)

लोकसभा निवडणूक 2024:  शिवसेना (UBT) उमेदवार यादी

    1. बुलढाणा- प्रा. नरेंद्र खेडेकर
    2. यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
    3. मावळ- संजोग वाघेरे पाटील
    4. सांगली- चंद्रहार पाटील
    5. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
    6. संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
    7. धाराशीव-ओमराजे निंबाळकर
    8. शिर्डी- भाऊसाहेभ वाघचौरे
    9. नाशिक- राजाभाऊ वाजे
    10. रायगड- अनंत गीते
    11. संधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत
    12. ठाणे- राजन विचारे
    13. मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील
    14. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
    15. मुंबई वायव्य- अमोल किर्तीकर
    16. परभणी- संजय जाधव

 

महाविकासआघाडीमध्ये लोकसभेसाठी जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच आहे. तिन्ही घटक पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा सांगितल्याने काही जागांवरील घोळ कायम आहे.  काँग्रेसनेही आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने त्याकडेही राजकीय पक्षांना लक्ष द्यावे लागत आहे. खास करुन उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळावा त्यासाठी उमेदवारी लवकरात लवकर जाहीर होणे महत्त्वाचे असते. असे असले तरी जागावाटप अद्यापही निश्चित न झाल्याने ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नाही अशा ठिकाणी संभाव्य उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Prakash Ambedkar: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निरंतर चर्चा करावे असे व्यक्तीमत्व- संजय राऊत)

एक्स पोस्ट

दरम्यान, महाविकासआघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकासआघाडीमध्ये समावेश होणार किंवा नाही याबाबत उत्सुकता आहे. आंबेडकर यांच्यासोबत सुरु असलेली बोलणी अद्यापही सुरुच आहे. त्यांच्याशी निरंतर चर्चा करावे, असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्याने आम्हालाही उर्जा मिळत असते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी काल (26 मार्च) केले होते. तसेच, वंचित बहुजन आघाडी आजही महाविकासाघाडीचाच भाग असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे वंचितबाबत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता आहे.