Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

शिवसेना दसरा मेळावा 2020 ( Shiv Sena Dussehra Melava 2020) निमित्त केलेल्या भाषणात मुख्यमंत्री, शिवसेना ( Shiv Sena ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार शरसंधान केले. त्यानंतर शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातूनही (Saamana Editorial) आज विरोधकांवर 'मार्मिक' शब्दात प्रहार करण्यात आले आहे. तर, 'हिंदुत्व (Hindutva) हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही' असे सांगत भाजपवर जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे.

सामनातील ठळक मुद्दे

'दोन सडेतोड तोफखाने' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात थेट शब्दांत म्हटले आहे की, 'हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती.

दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले. (हेही वाचा, Shiv Sena On PM Narendra Modi Speech: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल')

दै. सामना अग्रलेख (जसाच्या तसा)

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संपुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका श्री. भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत. शिवतीर्थावरील मेळाव्यात (वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहातील) मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही.

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे व ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे भागवत कधीच सांगणार नाहीत.

हिंदुत्वाची व्याख्या आज कधी नव्हे इतकी संपुचित झाली आहे. बलात्कार, खून यांसारख्या प्रकारांतही अनेकांना हिंदुत्व दिसू लागले तेव्हा धक्काच बसतो. उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, केंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी अभिमानाने ठेवलीच आहे. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही.