महाराष्ट्र ही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

कोणताही पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकला नाही. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट (President's Rule In Maharashtra ) लागू झाली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस (Shiv Sena-NCP-Congress) असे सत्तास्थापनेचे नवे गणित आकारास येत असतान शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला तीव्र शब्दांत ठणकावले आहे. तर, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या निर्णयाबद्दल राज्यपालांवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखात (Saamana Editorial) उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले आहे की, 'आज महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या भूमिकांचे पक्ष आपापले पत्ते हाती घेऊन पिसत आहेत. राजभवनाच्या हाती ‘एक्का’ नसतानाही त्यांनी तो फेकला. जुगारात (Gambling) असे बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही. महाराष्ट्रानं आतापर्यंत कोणावरही मागून वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे,' असे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या निर्णयावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली गेली होती, पण थोडा वेळ वाढवून दिला तर बरे होईल असे विचारताच ‘8.30’ सोडाच, पण भरदुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. अहो, निदान तुम्हीच दिलेल्या वेळेपर्यंत तरी थांबायचे होते, पण जणू कोणी तरी एखादी ‘अदृश्य शक्ती’ हा सर्व खेळ नियंत्रित करीत होती व त्याबरहुकूम सर्व निर्णय होत होते. देशाचे माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभेसे नाही. राज्यपाल येतील आणि जातील, पण महाराष्ट्र तेथेच राहणार आहे', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा जुना मित्रपक्ष राहिलेल्या भाजपवर तीव्र शब्दांत निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे की, 'महाराष्ट्रानं आतापर्यंत कोणावरही मागून वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखाऱ्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल. आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत. राज्यात राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा अखेर फिरवला आहे व त्याबद्दल कोणी मगरीचे अश्रू ढाळीत असतील तर त्याकडे एक ‘फार्स’ म्हणून पाहायला हवे. राष्ट्रपती राजवट दुर्दैवी असल्याची कळ माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुखपत्र सामनातून केली आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची कोणतीही बैठक झाली नाही; पसरलेल्या अफवेवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण)

सत्तेचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पद या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर ठाम होते. मागे हटायला कोणीच तयार नव्हते. त्यामुळे दोघांतील मतभेद इतके टोकाला गेले की, निकाल लागून तीन आठवडे उलटले विधानसभेचा कार्यकाळही संपला तरीही सरकार स्थापन होऊ शकले नाही. आता महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असे नवे सत्तासमीकरण उदयास येऊ पाहात आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून सत्तेत आलेला भाजप विरोधी पक्षात बसण्याची शक्यता आहे. अद्याप तरी कोणते सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता कोणते सरकार अस्तित्वात येते याबबत उत्सुकता आहे.