उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची कोणतीही बैठक झाली नाही; पसरलेल्या अफवेवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची अधिकृत पाठिंब्याची पत्रके नसल्यामुळे शिवसेना सत्ता स्थापन करू शकलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक मुंबईत सुरु झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय ठरवायचा याबाबत चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अहमद पटेल (Ahmed Patel) यांची शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी मीटिंग झाली, यामध्ये शिवसेनेला काही आश्वासने दिली गेली अशा बातम्या प्रसारमाध्यमांकडून देण्यात येत आहेत. मात्र यामध्ये काही तथ्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘अहमद पटेल यांची शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी मीटिंग झाली, यामध्ये शिवसेनेला काही आश्वासने दिली गेली अशा बातम्या माध्यमांद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. मात्र उद्धवजींकडून मला हे स्पष्ट करावेसे वाटते की, अशी कोणतीही बैठक झाली नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमचे अजूनही बोलणे चालू आहे.’ दरम्यान, काल मंगळवारी मुंबईत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या व्यतिरिक्त दिल्लीचे कॉंग्रेसचे तीन ज्येष्ठ मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि केसी वेणुगोपाल देखील उपस्थित होते. बैठकीनंतर शरद पवार आणि अहमद पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. याच पार्श्वभूमीवर अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाल्याची बातमी आली होती. मात्र ती पूर्णतः चुकीची असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी Sonia Gandhi यांना घातली 'ही' भीती; म्हणूनच शिवसेनेसोबत बोलणी करायला त्यांनी दाखवली तयारी)

सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक मुंबईमध्ये चालू आहे. या बैठकीस सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील आणि नवाब मलिक आदि प्रमुख नेते उपस्थित आहेत. आता या बैठकीत काय ठरणार आणि शिवसेनेला कोणत्या अटी मान्य कराव्या लागणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.