Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार;  महाराष्ट्र सरकारने उत्तर देण्याबाबत अवाहन
Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेमध्ये महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) आणि काँग्रेसवर केलेल्या आरोपावरुन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. देशात कोरोना वाढण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडले. त्यासाठी त्यांना रेल्वेची तिकीटे मोफत देण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषणादरम्यान केला. राष्ट्रपतींच्या अभीभाषणावर झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या उत्तरादाखल पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधानांच्या भाषणावरुन संजय राऊत यांनी जोरदार पलवार केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल संसदेमध्ये केलेला उल्लेख ऐकून वाईट वाटले. राज्य सरकारने त्याबाबत खुलासा करायला हवा. राज्य सरकारचे त्या काळात सर्व स्तरातून कौतुक झाले. मात्र, पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा, करोनाकाळात सातत्याने काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकताना आपल्याकडून काही चूक झाली की काय, असे वाटल्याने आपण त्यांचे भाषण पुन्हा वाचले. त्यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या उल्लेखाबद्दल राज्य सरकारने खुलासा करायला हवा. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने राबवलेल्या धारावी पॅटर्नचे जागतीक पातळीवरुन कौतुक झाल. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत कौतुक केले. राज्यातील भाजप पुढाऱ्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत बोलायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, PM Narendra Modi Speech in Parliament: 'मला वाटते कॉंग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याचे ठरवले आहे'- पीएम नरेंद्र मोदींनी साधला निशाणा)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात टाळेबंदीहोती. या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसने कोरोना पसरविण्याठी उत्तरप्रदेश, बिहारच्या लोकांना मोफत तिकीटे देऊन स्थलांतरीत होण्यास प्रवृत्त केले. तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात. त्यामुळे येथून निघून जा. महाराष्ट्रावरचे ओझे कमी करा. असे करुन त्यांचा देशात कोरोना पसरविण्याचाच अप्रत्यक्षरित्या प्रयत्न होता, असे मोदी म्हणाले. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’,असेही पंतप्रधानांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले.

दरम्यान, कोरोना काळात जे काम महाराष्ट्र सरकारला जमत नाही ते काम सोनू सूद करतो आहे असे सांगत त्याला राजभवनावर घेऊन जाणारे कोण होते? त्याचा सत्ताकर करणारे आणि तो लोकांना बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक करणारे कोण होते? असा सवाल विचारत संजय राऊत म्हणाले की, उलट आम्ही त्या वेळी सांगत होतो की घाई करु नका. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर राज्य सरकारने भूमिका मांडायला हवी. प्रत्येक वेळी मी बोलण्याचा ठेका घेतला नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारमधील नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली.