Mansukh Hiren Case: मनसुख हिरेन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले
Sanjay Raut (Photo Credits: PTI)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईस्थित घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंब्रा खाडीजवळ या हिरेनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. दरम्यान याबाबत राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'या प्रकरणामागील सत्य लवकरात लवकर समोर येणे गरजेचे आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी मिडियाशी बोलताना दिली.

"जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मिडियाशी बोलताना दिली आहे.हेदेखील वाचा- Mansukh Hiren मृत्यूचा तपास ATS कडे सुपूर्त; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

दरम्यान हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन (Vimal Hiren) यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी माझे पती मनसुख हिरेन आत्महत्या करुच शकत नाहीत असा दावा केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर काल विधीमंडळात एकच गदारोळ झाला. हे प्रकरण NIA कडे सोपवण्याची मागणी विरोधकांनी केली. परंतु, महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याने हा तपास ATS कडे सोपवण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.