Purvashi Raut Engagement Ceremony: संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा;  ठाकरे, पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित
Raut-Pawar Family | (File Photo)

मतभेद असले तरी मनभेद नाहीत या महाराष्ट्राच्या राजकारणातील सांस्कृतीक वारशाची आज पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार आहे. निमित्त आहे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या कन्येच्या साखरपुड्याचे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा साखरपुडा (Purvashi Raut Engagement Ceremony) आज मुंबई येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज (31 जानेवारी) सायंकाळी पार पडत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणातील दिग्गज एकाच व्यसपिठावर येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुंबई येथे नुकतेच झाले. या कार्यक्रम प्रसंगी हे सर्वजण एकत्र आले होते.

प्राप्त माहितीनुसार, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा आणि संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. या विवाहाचा साखरपूडा आज पार पडत आहे. संजय राऊत हे राजकीय व्यक्तमत्व आहे. तसेच ते पत्रकारही आहेत. त्यमुळे या सोहळ्याला अनेक महत्त्वाचे लोक उपस्थिती लावणे निश्चित आहे. अनेकांना या सोहळ्याचे निमंत्रण काही दिवसांपूर्वीच पोहोचल्याचे समजते. (हेही वाचा, 'सामना' च्या भाषेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अखेर संपादिका रश्मी ठाकरे यांना लिहिले पत्र, काय लिहिलय त्या पत्रात?)

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यातील राजकीय वर्तुळासोबतच प्रसारमाध्यमांचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात नुकतीच सहकुटुंब भेट झाली होती. कन्या पूर्वशी हिच्या साखरपुड्येच निमंत्रण देण्यासाठीची ही भेट होती. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. ही भेट झाली तेव्हा राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीची नोटीस आली होती. अनेकांनी ईडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असावी असा तर्क लावला होता. मात्र, ही भेट मुलीच्या साखरपुड्याच्या निमंत्रणाच्या निमित्ताने होती हे आता स्पष्ट झाले आहे.