
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही इतिहास वाचतो, तो चिवडत बसत नाहीत, असा टोला लगावत गरज पडल्यास चंद्रकांत पाटील यांना शिवचरीत्र (Shivcharitra) भेट देऊ, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी जुन्नर येथील कार्यक्रमात बोलताना कोथळा काढण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हटले होते. यावर प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी हे भाष्य केले.
संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्या विधानावरुन ते गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण गुन्हा कोणावर दाखल करणार? मी कोणाचा कोथळा बाहेर काढायची भाषा केली, हेही सांगायला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना वाचण्यासाठी शिवचरित्र पाठवून देऊ. अनेकांनी शिवचरित्र लिहिले आहे. सेतू माधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरीत्र लिहिले आहे. इतरांनीही लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी इतिहासात कोथळा काढणे म्हणजे काय ते समजून घ्यावे असेही संजय राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा तुम्ही द्वेश का करता? संजय राउत यांचा केंद्र सरकारला थेट सवाल)
चंद्रकांत पाटील यांनी खंजीर खुपसण्याची भाषा केली होती. त्यामुळे मी त्यांना कोथळा काढण्याची इतिहासातील परंपरा समजून सांगत होतो. खंजीर खुपसण्याची आपली परंपरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पुढून वार केला. त्यांनी कधीही पठिमागून वार केला नाही. त्यांनी समोरुन कोथळा काढला. त्यामुळे तिच परंपरा मी समजावून सांगत होतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे कोणाविरोधात गुन्हा दाखल करणार याबाबत माहिती घ्यावी लागेल असेही संजय राऊत म्हणाले.
हे राजकारण आहे आणि राजकारणात कोणीही साधुसंत असत नाही. त्यामुळे उगाच खंजीर वैगेरे हे शब्द वापरु नये. पहाटेचा घेतलेला शपथविधी हे राजकारण, मध्य प्रदेशमध्ये माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसमधून फोडणे हे राजकारण आणि हेच जर इतरांनी केले तर खंजीर खुपसला? हे शब्द कोणी राजकारणात वापरु नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.