Sanjay Raut (Photo Credit - PTI)

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना हृदयासंबंधी त्रास होत असल्याने मुंबईतील (Mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होणार आहे. त्यांच्यावर गुरुवारी (3 डिसेंबर) अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. यासंदर्भात त्याच्या कुटुंबातील एकाने माहिती दिली आहे. दरम्यान, "तुमच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत येतो, असे संजय राऊत यांनी रुग्णालयात जात असाताना आपल्या शैलीत एक खास संदेश दिला आहे. संजय राऊत यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये छातीत त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन ब्लॉक आढळले होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल 2020 मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तीच शस्त्रक्रिया उद्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut On Yogi Adityanath: मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही; संजय राऊत यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला

संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ता आहेत. मागील काही दिवसांपासून कंगना प्रकरण, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण ते अगदी आज युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा यावर सडेतोड प्रतिक्रिया देऊन त्यांनी विरोधकांच्या अनेक आरोप-प्रत्यारोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.