साई जन्मस्थळावरून पाथरीकर आक्रमक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी परभणी येथील शिवसेना खासदार संजय जाधव मुंबईत दाखल
Shirdi Sai Baba Mandir(Photo Credit: Wikimedia Commons )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाथरीचा (Pathri) उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांनी नाराजी दर्शवत रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा बंद मागे घेण्यात आला होता. शिर्डीतील बंदवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकास आराखड्यातून साई जन्मस्थळाचा उल्लेख वगळण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, यावर पाथरीचे रहिवासी नाराज झाले असून परभणी येथील शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे पाथरीच्या रहिवाशांच्या शिष्टमंडळासह उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच याप्रकरणी उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेला वाद मिटल्याचे सांगितले जात असतानाच साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचा ठराव पाथरीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. यातच परभणीचे शिवसेना खासदार पाथरीचे शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे साई जन्मस्थळाचा वाद अद्याप मिटला नसल्याचे चिन्ह दिसत आहेत. हे देखील वाचा- 'या' कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाही पाहिला 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर'

एएनआयचे ट्विट-

महत्वाचे म्हणजे, परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावच्या रहिवाशांनी साईबाबांचा जन्म पाथरीत झाला असल्याचा दावा केला आहे. तसेच शिर्डी त्यांची कर्मभूमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाथरी गावालाही शिर्डीप्रमाणे तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी आग्रही मागणी पाथरीवासियांनी सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब करीत पाथरीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही केली होती.