महाराष्ट्रामध्ये सत्तांतराच्या घडामोडीनंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै दिवशी बोलावण्यात आले आहे. यामध्ये 3 जुलैला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक भाजपाच्या राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar) विरूद्ध शिवसेनेच्या राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यामध्ये होणार आहे. आज महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या राजन साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतसंघाचे आमदार आहेत. सलग 3 वेळेस ते या मतदारसंघातून विधिमंडळात निवडून गेले आहेत.
दरम्यान कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार होताच रिक्त झालेल्या या पदासाठी कॉंग्रेस कडूनच उमेदवार दिला जाईल अशी अपेक्षा होती पण मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता आज महाविकास आघाडीकडून राजन साळवी या शिवसेना आमदाराचे नाव घोषित करण्यात आले आहे. राजन साळवी यांनी सुनिल प्रभु, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज दाखल केला आहे.
Mumbai: Shiv Sena MLA Rajan Salvi files his nomination for Maharashtra Assembly Speaker election. pic.twitter.com/3bBhlRfTwy
— ANI (@ANI) July 2, 2022
शिवसेनेत बंडाळी होत असताना राजापूरचे आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. काही दिवसांपूर्वीच त्यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाली आहे. 3 जुलैला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल त्यानंतर 4 जुलैला नव्या स्थापन झालेल्या सरकारला आपलं बहुमत विधिमंडळामध्ये सिद्ध करावं लागणार आहे.