Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांच्या एक पथकाने शिवसेना आमदार प्रताप सरकानाईक ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik ) यांच्या घर आणि कार्यालयात शोधमोहीम सुरु केल्याचे वृत्त आहे. ईडीचे पथक केवळ सरनाईक यांच्या घरीच नव्हे तर त्यांच्या कार्यालयातही पोहोचले आहे. आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांचे चिरंजीव सध्या काही कारणामुळे भारताबाहेर आहेत. परंतू, पूर्वेश सरनाईक विंहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथक पोहोचले आहे.हे पथक नेमके कोणत्या कारणामुळे सरनाईक कुटुंबीयांच्या घरी पोहोचले आहे त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.

शिवसेनेच्या इतरही काही ज्येष्ठ नेत्यांना ईडीची नोटीस मिळाल्याचे वृत्त आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने शिवसेनेच्या ज्या नेत्यांना नोटीस बजावली आहे त्यात शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांची नावे ईडीने अद्याप जाहीर केली नाहीत. परंतू, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हे नेते अत्यंत ज्येष्ठ असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Enforcement Directorate: ईडीची नोटीस आलीय? घाबरु नका, आधी खात्री करा, फसवणूक करणारी टोळी सक्रीय)

ईडीचे अभिनंदन- किरीट सोमय्या

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीचे पथक सरनाईक यांच्या घरी पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आहे. काही काळांपूर्वी सरनाईक यांचे नाव एका घोटाळ्यात आले होते. त्याचा काही संबंध या कारवाईशी आहे का हे पाहावे लागेल. परंतू, मुंबई महापालिकेतील माफीया आणि शिवसेनेतील काही लोक यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिवसेनेच्या वरीष्ठ नेतृत्वापासून ते तळागाळातील नेतृत्वापर्यंत अनेकांचे माफियांशी संबंध आहेत. त्यामुळे ईडीचे पथक पोहोचले असावे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

राजकारणाचा संबंध जोडू नये- प्रविण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ईडीच्या कारवाईबाबत मला माहिती नाही. परंतू, असे काही घडले असेल तर कोणीही त्यात राजकारण शोधू नये. अलिकडे राजकारण हे फारच दुराग्रही झाले आहे. परंतू, ईडीची कारवाई आणि राजकारण याचा कोणीही संबंध नाही. ईडीच्या नोटीसा अनेक लोकांना जात असतात. त्यामुळे कोणीही काळजी करु नये. अनेकदा ईडीकडे वेगवेळ्या प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. अशा वेळी ईडी चौकशी करत असते. यात राजकारणाचा संबंध जोडू नये, असे प्रविण दरेकर यानी म्हटले आहे.

.