Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

खरी शिवसेना (Shivsena) कोणाची? शिंदे गटाच्या 16 आमदारांची पात्रता काय? या प्रश्नांची उत्तरे आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आपल्या दीर्घ निर्णयात दिली आहेत. या निर्णयानंतर राज्य सरकारची स्थिती जैसे थेच राहिली असून, उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा झटका बसला असल्याचे दिसत आहे. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला.

सर्वात महत्वाचे म्हणजे, खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला आहे. यासह विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व 16 आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत.

यासोबतच विधानसभा अध्यक्षांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजेच शिवसेना (UBT) गटाचे 14 आमदार देखील पात्र असल्याचा निकाल दिला आहे. त्यांना अपात्र घोषित करण्यासाठी शिंदे गटाचे मुख्य सचिव भरत गोगावले यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणातील शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून सर्व 40 आमदार पात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा: Shiv Sena MLA Disqualification Case Verdict: एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र, उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण)

आज, म्हणजेच बुधवारी सायंकाळी विधानसभेत 1200 पानी निर्णयाचे मुख्य मुद्दे वाचून दाखविताना नार्वेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 55 पैकी 37 आमदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील गटच खरी शिवसेना आहे. निवडणूक आयोगानेही तसा निर्णय दिला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. आपला निर्णय सुनावताना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंकडे नाही. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला हटवण्याचा अधिकार शिवसेनाप्रमुखांना नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी मान्य करता येणार नाही.