शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर; पिक विमा कंपनीच्या विरोधात निघणार विशाल मोर्चा
Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे (Drought) सावट आहे. मान्सूनचे आगमन होऊनही पिकांसाठी अपेक्षित असा पाऊस झाला नाही. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे, पिक विम्याचे पैसे त्यांना मिळावेत अशी तरतूद केली आहे. मात्र या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. याच मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनी कार्यालयांवर (Crop Insurance Company) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल.

बीकेसी मधील ‘भारती ऍक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे. याचवेळी राज्यभरातील शिवसैनिक राज्यातीत विविध विमा कंपन्यांच्या कार्यालयांना भेट देणार आहेत. आज मुंबईमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. (हेही वाचा: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये शेतकऱ्याला काय दिलं पाहा)

शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, मात्र बँकांच्या अनेक नियमांमुळे ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. पिक विमा कंपन्याही विविध कारणे देऊन शेतकऱ्यांना मदत करण्यात टाळाटाळ करत आहेत. नेहमीच शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शिवसेनेन आज हा मुद्दा उचलून धरला आहे.

असा असेल मोर्चाचा मार्ग – सकाळी 11 वा. मोर्चा सुरु होईल

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉट - बँक ऑफ इंडिया - स्टेट बँक ऑफ इंडिया - कोटक महिंद्रा बँक - जियो वर्ल्ड कंपनी - भारती ऍक्सा (परिणी)