Sanjay Raut | (File Image)

सीबीआय (CBI) , ईडी (ED), या संस्थांचा वापर करुन कितीही दबाव टाकला तरी आम्ही घाबरत नाही. दबावाच्या राजकारणाला आम्ही भिक घालत नाही. आमदार, खासदारांच्या दारात ईडीने कार्यालय जरी थाटले तरी, फरक पडणार नाही. आम्ही लढत राहू. सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. दबाव टाकून सरकार पडेल असे भाजपला वाटत असेल तर ते त्यांनी विसरुन जावे, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला ईशारा दिला आहे. ईडीचे पथक (ED Team Reached Pratap Saranaik's House) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. या वेळी ते बोलत होते.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. या महाराष्ट्रात दबावाचे राजकारण चालत नसते. भाजपला जर आमच्या विरोधात लढायचेच आहे तर त्यांनी समोर येऊन लढले पाहिजे. शिखंडीसारखे असे पाठिमागून लढू नये. महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकार चांगले चालले असताना सरकार पडेल अशा घोषणा ते दररोज करत आहेत. परंतू तुम्ही जर अशा प्रकारचे राजकारण करत असाल तर पुढची चार वर्षेच काय त्याहीपलीकडे जाऊन सांगतो, हे सरकार पुढचे 25 वर्षे टीकेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

साम दाम दंड भेद वापरण्याची मास्टरकी आमच्याकडेही आहे. आम्हालाही त्याचा वापर करता येतो, असे ठणकावून सांगत भाजपला इशारा देत संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, ईडी, सीबीआय अशा संस्थांचा वापर करुन नोटीस कसल्या पाठवता. थेट समोरासमोर लढा. अशा प्रकारचे राजकारण करुन तुम्ही शकता असा जर विश्वास तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असेही राऊत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, ED Team Reached Shiv Sena MLA Pratap Sarnaik's House and office: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयात ईडीची शोधमोहीम)

दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ईडी, सीबीआय अशा संस्थांनी केंद्राचे बाहुले किंवा भाजपची शाखा असल्यासारखे काम करु नये. धाड कसली टाकता. थेट घरी या. एखादा व्यक्ती घरी नसल्याचे पाहून घरातील कुटुंबीयांना घाबरवीण्यासाठी धाड टाकता, हा गलिच्छपणा आहे असे सांगत राऊत यांनी ईडी, सीबीआय या संस्थांवर टीका केली.