Arjun Khotkar | PC: Facebook

शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने (ED Raid) तब्बल 18 तास चौकशी केली. अर्जुन खोतकर यांच्या औरंगाबाद, जालना (Jalna) येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळी छापा (ED Raids at Premises of Shiv Sena Leader Arjun Khotkar) टाकला. त्यानंतर अर्जुन खोतकर यांची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी काही दिवसांपूर्वीच अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हा आरोप जालना येथील साखर कारखाना विक्रीत व्यवहाराशी संबंधित होता. त्यानंतर इडीने ही कारवाई केली आहे. अर्जुन खोतकर हे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे ईडीकडून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचीही चौकशी करण्यात आली. एकाच वेळी खोतकर यांच्याशी संबंधित दोन ठिकाणी धाडी टाकल्यामुळे शहरात चर्चेला उधान आले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले. या आरोपांनंतर काहीच दिवसात ईडीने खोतकर यांच्या राहत्या घरी छापा टाकला. ईडीने अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील भाग्यनगर परिसरात असलेल्या बंगल्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवाईस सुरुवात केली. इडीचे 12 अधिकारी या चौकशीत सहभागी असल्याचे समजते. (हेही वाचा, ED Raid On Arjun Khotkar: औरंगाबादमध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी)

इडीचे अधिकारी अर्जुन खोतकर यांच्या घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजलेपासून चौकशी सुरु झाली. या वेळी अर्जुन खोतकर हे घरीच होते. ईडीने खोतकर यांच्या निवासस्थानासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही झडती घेतली. किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथील रामनगर सहकारी साखर कारखान्यात उद्योजकांच्या माध्यमातून आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या कारवाई विरोधात अर्जुन खोतकर प्रसारमाध्यमांना माहिती देणार असल्याचे समजते.