![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/08/Narayan-Rane-1-380x214.jpg)
शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जीवाला धोका होता. शरद पवार (Sharad Pawar) यांनी तसा फोन केला होता. त्यांनी बाळासाहेबांना मातोश्री (Matoshree) सोडायला सांगितले होते. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन केला. उद्धव ठाकरे यांना नाही. बाळासाहेबांनी मला सांगितले की, मी घरातून बाहेर पडलो की तुझ्या गाड्या मागे आल्या पाहिजेत. ते मला अज्ञात स्थळी घेऊन गेले, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेत असतानाचे अनेक किस्से प्रसारमाध्यमांशी शेअर केले. या वेळी त्यांनी शिवसेनेसोबत काहीशी सामंजस्याची भूमिका व्यक्त करत शिवसेना घडवण्यात आमचाही हातभार होता, असे म्हटले.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज समारोप होतो आहे. या वेळी नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नारायण राणे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवाद्यांकडून धोका होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे अज्ञात स्थळी गेले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. बाळासाहेब जोपर्यंत अज्ञातवासात होते तोपर्यंत मी झोपलो नव्हतो. रात्री वाहनातच झोपायचो. कुठून तरी खायला आणायचो. कधी कधी माँसाहेब डबा पाठवायच्या अशी आठवण राणे यांनी सांगितली. (हेही वाचा, Ajit Pawar on Narayan Rane: 'त्यांचं त्यांना लखलाभ', नारायण राणे यांच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया)
संजय राऊत यांनी उगाचच दुसऱ्यांच्या कुटुंबावर बोलू नये. आपल्या मालकांची मुलं काय करतात तेही पाहावे. उगाच टीका करत बसू नये. काही लोकांचे ते कामच आहे. हे लोक पदासाठी अशी काम करत असतात. नारायण राणे यांच्यावर टीका केली की पदे मिळतात. उदाहरणच द्यायचे तर इथला खासदार. मी त्यांचे नाव घेणार नाही, असे म्हणत राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. दोन राऊत शिवसेना बुडवणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. तसेच, सामनामधून राऊत यांनी आमच्याविषयी लिहीणे बंद करावे नाहीतर प्रहारमधून आम्हीही उत्तर देऊ. येवढी यात्रा संपली की प्रहारमधून उत्तर दिले जाईल, असेही राणे म्हणाले.