Shiv Sena Foundation Day 2024: मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena) पक्षाची स्थापना झाली होती. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केल्याने शिवसेनेत फूट पडली. पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले होते, तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले. आता उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दोन्ही गट बुधवारी, 19 जून रोजी पक्षाचा 58 वा स्थापना दिवस शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहेत.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील समाधीस्थळी दोन्ही गटातील नेते त्यांना आदरांजली वाहणार आहेत. त्यांच्या भेटींच्या विशिष्ट वेळा निश्चित केल्या गेल्या नसल्या तरी, पक्षांनी कार्यक्रमस्थळी एकत्र येणे टाळावे अशी अपेक्षा आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे. या कार्यक्रमादरम्यान ठाकरे पक्षाच्या नेत्यांना संबोधित करतील आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करतील, असे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सांगितले. दुसरीकडे, वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) संकुलात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम होणार आहे.
(हेही वाचा: Shivsena UBT: मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना वारंवार फोन आले, 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा अनिल परब याचा दावा)
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला बळ देण्याच्या उद्देशाने शिंदे यांनी राज्यभरातील पक्षाचे नेते, खासदार, आमदार, माजी नगरसेवक आणि इतर अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी हिंदुस्तान टाईम्सला माहिती दिली की, पक्ष त्यांची सदस्यत्व मोहीम 19 जून रोजी सुरू करेल, त्यानंतर मतदार नोंदणी मोहीम सुरू होईल. शिंदे सरकारची दोन वर्षे साजरी करण्याच्या योजनांची रूपरेषाही या कार्यक्रमात दिली जाणार आहे. स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात एक लाख झाडे लावणार आहेत.