Shiv Sena Dussehra Rally 2020: शिवतीर्थ यंदा सुने सुने! शिवसेना दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार, कोरोना व्हायरस संकटामुळे परंपरा खंडीत
Shiv Sena Dussehra Rally | (File Image)

शिवसेना (Shiv Sena) आणि मुंबई (Mumbai) येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदान यांचा गेल्या अनेक वर्षांचं नातं. प्रत्येक वर्षी दसरा सणाला याच मैदानातून शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dussehra Melava) पार पडत आला. शिवसेनेच्या स्थापनेपासून कायम असलेली ही परंपरा यंदा (2020) खंडीत झाली. कोरोना व्हायरस संकटाचा फटका शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही (Shiv Sena Dussehra Rally 2020) बसला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थ येथे साजरा होणारा दसरा मेळवा यंदा शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात (Swatantrya Veer Savarakar Smarak) घेतला जाणार आहे. तसेच या मेळाव्यास सभागृहात केवळ 100 लोकच हजर राहणार आहेत. उद्धव ठाकरे या ठिकाणी भाषण करणार आहेत. हे भाषण व्हर्च्युअल रुपात लाईव्ह दाखवले जाणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

संजय राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी शिवतिर्थ येथून केलेल्या घोषणेनुसार राज्यात शिवसेनेची सत्ता आली आहे आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच झाला आहे. त्यामुळे यंदा नेहमीप्रमाणेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार होता. परंतू, कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर यंदा नेहमीप्रमाणेच बंदी कायम आहे. त्यामुळे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. (हेही वाचा, Shiv Sena Dasara Melava 2020: दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण व्यासपीठावरुनच होणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती)

दसरा सण जवळ आल्याने शिवतीर्थावर साजऱ्या होणाऱ्या दसरा मेळाव्याचे शिवसेना नेत्यांकडून नियोजन सुरु होते. परतू, राज्यात काही प्रमाणात अनलॉक केले असले तरी अद्यापही सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेले निर्बंध कायम आहेत. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेलाही कायदा आणि नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. याची जाणीव असल्यानेच शिवसेनेने पर्यायी मार्ग काढण्याचा विचार केला. त्यानुसार यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि त्यातही ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती थेट विधिमंडळात त्यातही मुख्यमंत्री पदावर आल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोष होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसेना धुमधडाक्यात साजरा करणार याबाबत शंकाच नव्हती. परंतू, कोरोना संकट आले आणि शिवसैनिकांच्या आनंदावर विरजन पडले. नाईलाजाने का होईना शिवसेनेला दसरा मेळावा एका छोटेखणी सभागृहात घ्यावा लागत आहे.