Uddhav Thackeray (Pic Credit - ANI)

शिवसेना (Shiv Sena), शिवाजी पार्क (Shivaji Park), दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) आणि 'ठाकरे' (Thackeray) हे पाठिमागील अनेक वर्षे जनमानसात घट्ट झालेले समिकरण. यंदा मात्र हे चित्र काहीसे धुसर झाल्याचे पाहायला मिळते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसरा एकनाथ शिंदे गट. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यामुळे मुंबईतील शिवतीर्थ येथील दसरा मेळावा यंदा कोण घेते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दादर येथील जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. त्यामुळे अर्जावर काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेना दसरा मेळावा परवानगीबद्दल मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी म्हटले आहे की, सध्या गणपती उत्सवाची तयारी सुरु आहे. सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि यंत्रणा गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतली आहे. त्यामुळे शिवसेना दसरा मेळाव्याबाबतचा अर्ज मुंबई महापालिकेने अनिर्णीत ठेवला आहे. गणेशोत्सवानंतर दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. (हेही वाचा, Aditya Thackeray Statement: दसरा मेळाव्यासाठी अधिकारी आमचा अर्ज स्वीकारत नाहीत, आदित्य ठाकरेंनी साधला शिंदे सरकारवर निशाणा)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून कोरोना काळ वगळता आजपर्यंत दरवर्षी शिवसेना दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत. यंदाही येत्या 5 ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर शिवसेना दसरा मेळावा पार पडणार आहे. परंत, त्यासाठी आवश्यक परवानगीसाठी दोन पत्रे पाठवूनही महापालिकेने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हजेरी लावत असतात.

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक कारभार करत आहे. त्यामुळे पालिकेवर सद्यास्थितीत तरी राज्य सरकारचा अप्रत्यक्ष अंमल आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळेच पालिकेने अर्जाला मान्यता देण्याचा निर्णय काहीसा प्रलंबित ठेवला आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, महापालिकेच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काहीशी टीका केली आहे.