पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra) यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेली 90 मिनिटांची प्रदीर्घ मुलाखत किती प्रभावी ठरली याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. या मुलाखतीवरुन विरोधकांसोबतच सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही (Shiv Sena) जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत म्हणजे केवळ चहाच्या कपातले वादळ. ही मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. मुलाखत फक्त वाजली इतकेच, अशा उपहासात्मक शब्दात शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी हा हल्ला चढवला आहे.
'वाजलेली मुलाखत'
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे वत्तपत्र दै. सामनामध्ये लेख लिहीला आहे. 'वाजलेली मुलाखत' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात उद्धव यांनी म्हटले आहे, 'पंतप्रधान मोदी यांनी एक जोरकस मुलाखत एकाच वृत्तवाहिनीला दिली आहे. मुलाखत मोजून 95 मिनिटांची असल्याचे बोलले जाते. पंतप्रधानांची मुलाखत मोठय़ा कालखंडाने येत असल्याने ‘चर्चा तर होणारच.’ तशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी होती. मोदी यांनी एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. पंतप्रधानांनी जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. तो चुकीचा आहे. राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली काय?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. (हेही वाचा, मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून फटकारे)
गेल्या चार-पाच वर्षांत मोदी प्रथमच खरे बोलले.
'सध्या राममंदिराचा विषय जोरात आहे. मंदिराबाबत मोदी एखादी महत्त्वाची घोषणा करून अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा वनवास संपवतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदी यांनी नेमकी विरुद्ध भूमिका घेतली आहे. राममंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह शिवसेनेची होती. मोदी यांनी ती साफ ठोकरून लावली आहे. मोदी म्हणाले, काही झाले तरी अध्यादेश काढणार नाही. राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. मोदी यांनी हे परखडपणे सांगितले ते बरे झाले व गेल्या चार-पाच वर्षांत ते प्रथमच खरे बोलले', असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे. (हेही वचाा, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामुळे लोक राफेल विसरणार नाहीत: शिवसेना)
मोदी सरकारच्या हाती काहीच लागले नाही
मुलाखतीदरम्यान मोदी यांनी नोटबंदीचा उल्लेख केला. त्यावरुन टीका करताना उद्धव यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा विषय मोदी यांनी घेतला. नोटाबंदी हा झटका नव्हता. एक वर्ष आधीच जनतेला सावध केले होते असे मोदी म्हणाले. आता ही जनता कोण? बँकांच्या रांगेत उभी राहिलेली आणि रोजगार गमावल्यामुळे जे तडफडून मेले ती जनता नव्हती काय? धनदांडग्यांचा काळा पैसा सहज पांढरा झाला व मोदी सरकारच्या हाती काहीच लागले नाही. परदेशातील काळा पैसा देशात आणायचा व त्यातले प्रत्येकी 15 लाख जनतेच्या बँक खात्यावर जमा करण्याचा वायदा होता. साहेब, त्याचे काय झाले? खरे म्हणजे नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता.