'देशहितासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

जवानांची मुंडकी उडवून हिंदुस्थानला आव्हान दिले जात असताना आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देत बसलो आहोत, असे सांगतानाच पाकिस्तान विषयाचे राजकारण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न संपला नाही. त्यामुळे पुढचे कठोर पाऊल उचलणे देशहिताचे आहे व त्यासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपप्रणीत मोदी सरकारला लगावला आहे. 'पाक सुधारला नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू', असे विधान देशाच्या लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा देताना केले होते. या विधानावरुनच उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी?

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, कशासाठी?असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी लेख लिहिला आहे. या लेखात 'संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या अजूनही भाजप प्रवक्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडलेल्या नाहीत. सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळाप्रकरणी वकिली करण्यात त्या अडकून पडल्याने लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिलेला दिसतो', असा चिमटा काढत 'दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईकही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता व त्याच सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करून भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. भाजपने निवडणुका जिंकल्या, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय?'असा सवाल उपसस्थित केला आहे.

अयोध्येत शरयू लाल झाली, पण मंदिर काही झाले नाही

'अयोध्येच्या लढय़ात करसेवकांच्या हौतात्म्याने शरयू लाल झाली, पण मंदिर काही झाले नाही. तसे कश्मीर प्रश्नाचे, पाकिस्तान विषयाचे राजकारण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न संपला नाही. त्यामुळे पुढचे कठोर पाऊल उचलणे देशहिताचे आहे व त्यासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे. लष्करप्रमुखांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेले वक्तव्य हे हतबलतेतून आले आहे काय?' असा सवाल विचारतानाच, 'पाकिस्तानचे हे नापाक उद्योग एखाद्या सर्जिकल स्ट्राईकने थांबतील काय? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.