शिवसेना आमदारांना (Shiv Sena Legislators) पॅनकार्ड, आधार कार्ड आणि पाच दिवस पुरतील इतके कपडे घेऊन मुंबईकडे रवाना होण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व आमदारांची एक बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे स्वत: आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आमदारांना सलग पाच दिवस मुंबईत बोलावल्यामुळे सत्तास्थापनेच्या दिशेने ही टाकलेली पावले तर नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट बाजूला करुन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या शिर्ष नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरु असल्याचे संकेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या बैठकीत नेमके काय घडते याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांची बैठक शुक्रवारी (22 नोव्हेंबर 2019) दुपारी 12 वाजता मातोश्री निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसाण तसेच राज्यातील सत्तापेचामुळे जनतेच्या मनात निर्माण झालल्या भावनांचा आढावा घेण्यात येईल. यासोबतच शेतकऱ्यांसाठी आमदारांनी काय मदत केली याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. (हेही वाचा, संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवार यांची भेट; राष्ट्रवादी देणार का शिवसेनेला साथ की खेळणार एक नवी खेळी?)
दरम्यान, आमदारांना आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच पाच दिवस राहण्यासाठी कपडे घेऊन येण्यास सांगितले आहे. त्यामुळे तर्क लावण्यात येत आहे की, ही सत्तास्थापनेची हालचाल असू शकते. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केल्यास राज्यपाल ओळख परेड घेऊ शकतात. त्यामुळे आमदारांकडे ओळख दाखविण्यासाठी आधार, पॅन यांसारखे काहीतरी ओळखपत्र हवे म्हणूनच आमदारांना पक्षाकडून असे आदेश गेले असावे, असे बोलले जात आहे.