Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in)

एकीकडे कोरोना निर्बंधांमधून लोकांची सुटका होत असल्याने जीवन पूर्वपदावर येत असल्याची चिन्हं आहेत. पण शिर्डीमध्ये साई भक्तांची मात्र अद्याप निर्बंधातून पूर्ण सुटका झालेली नाही. कोरोना संकटात बंद असलेली शिर्डीमधील गुरूवारची पालखी मागील आठवड्यात सुरू करण्यात आली होतीपण आता जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा प्रतिबंधात्मक आदेश लावत स्थगित केली आहे. या निर्णयामुळे सध्या साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. 22 मार्च पर्यंत जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.

नव्या आदेशामुळे आता शिर्डीमध्ये पालखी सोहळ्यासोबतच रंगपंचमी दिवशी निघणारी रथयात्रा देखील रद्द झाली आहे. अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांच्या माहितीनुसार 14 मार्चच्या आदेशावरून 22 मार्च 2022 पर्यंत सारे उत्सव, साईबाबांची गुरूवारची पालखी आणि रंगपंचमी याबाबतची मिरवणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित राहिल.

शिर्डी मध्ये दर गुरूवारी द्वारकामाई ते चावडी आणि चावडी ते साई समाधी मंदिर अशी पालखी निघते. कोरोना संकटात मागील 2 वर्ष ती बंदच होती. मागील आठवड्यातच ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला होता पण आता त्याला पुन्हा ब्रेक लागला आहे. नक्की वाचा: Pune-Shirdi-Nagpur Flight: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; 18 फेब्रुवारीपासून सुरु होणार पुणे-शिर्डी-नागपूर दैनंदिन विमानसेवा .

मटा च्या वृत्तानुसार, ‘प्रतिबंधात्मक आदेश असले तरी नियम पाळून हा सोहळा करता येऊ शकतो. सरकारने आता विश्वस्त मंडळ स्थापन केले आहे, त्यामुळे प्रशासनाने असे निर्णय विश्वस्तांना विश्वासात घेऊन घेतले पाहिजेत.’अशी प्रतिक्रिया विश्वस्त सचिन गुजर यांनी दिली आहे.