
Shirdi Sai Baba Punyatithi 2019 Programme Dates: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री साईबाबा (Shri Sai Baba) यांची येत्या 7 ऑक्टोबरला हिंदू पंचांगानुसार 101 वी पुण्यतिथी आहे. 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते. बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की, हा दिवस अनंतामध्ये विलीन होण्यासाठी सर्वोत्तम आहे. याचे संकेत बाबांनी काही वर्षांपूर्वीच दिले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्यांच्या या शतकोत्तर पुण्यतिथी निमित्त लाखो भाविक शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी येतात. सालाबादप्रमाणे यंदाही कित्येक भाविक साईचरणी लीन होण्यासाठी शिर्डीस भेट देतील. साईंच्या या प्रिय भक्तांना शिर्डीचा हा अद्भूत सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता यावा यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात साईंच्या काकड आरती पासून पालखी, रथ सोहळा, पाद्यपूजा, किर्तन, सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत शिर्डीत हा विशेष सोहळा संपन्न होणार आहे. असे असेल संपूर्ण वेळापत्रक

या सोहळ्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तांनी श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता पालखीव्दारे येणा-या पदयात्री साईभक्तांकरीता स्वतंत्र पालखी गेट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
पालखीतील पदयात्रींच्या भावनांचा विचार करुन व सुरक्षा यंत्रनेच्या अभिप्रायाअंती येत्या श्री पुण्यतिथी (दसरा) उत्सवापासून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता पालखीव्दारे येणा-या पदयात्री साईभक्तांना हा स्वतंत्र पालखी गेट सुरु करण्यात येणार आहे. याकरीता पालखी प्रमुखांनी पालखी निघण्यापुर्वी संस्थानच्या संरक्षण विभागात नोंदणी करणे गरजेचे असल्याचे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.