ShilPhata Road (Photo Credits: Twitter)

मुंबईत वाहतूककोंडीची समस्या काही नवीन नाही. वाहतूककोंडीच्या प्रश्नाने गेली कित्येक वर्षे प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे शिळफाटा रोड (ShilPhata Road). शिळफाटा येथून मानपाडा रोडवरुन डोंबिवलीकडे येणा-या रस्त्यांवर नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. हा वाहतूककोंडीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम पुढील आठवड्यापासून सुरु केले जाणार आहे. मटाने दिलेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रा राज्य वाहतूक रस्ते महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी अधिका-यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या या मार्गे प्रवास करणा-या प्रवाशांना सतावत आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) यांनी प्रशासनाकडे उड्डाणपुलाची मागणी केली होती. या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यापूर्वीच 'एमएमआरडी'कडून मंजुरी मिळाली आहे. या कामाबरोबरच पुढे डोंबिवली-मानपाडा रस्त्यापासून प्रीमियर कंपनी, मानपाडा रस्त्याकडे येणारे चारपदरी रस्ते सहापदरी करण्यासाठी तसेच या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी खासदार शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'एमएसआरडीसी'चे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी देत हा रस्ता काँक्रिटीकरणाद्वारे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- ठाणे: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा रोड वर 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, गाडीवरुन खाली पडताच कंटेनरने चिरडले

मात्र आचारसंहितेमुळे हे काम अडकले होते. ते काम आता तातडीने सुरु करण्यासाठी खासदार शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गायकवाड यांची त्यांच्या मलबार हिल, मुबंई येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी गायकवाड यांनी पुढील आठवड्यात सदर कामे चालू करण्याचे आश्वासन दिले.

सध्याचे चारपदरी रस्ते तसेच ठेवून दोन्ही बाजूला नव्याने एकेक लेनचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जाणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर सध्याच्या चारपदरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले जाईल. तत्पूर्वी दुतर्फा गटारे, फूटपाथ, पायवाट यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात शिळफाटा ते प्रीमियर कंपनीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येइल. दुसऱ्या टप्प्यात रांजनोली नाका ते दुर्गाडी पुलापर्यंतचे काम करून, दुर्गाडी ते प्रीमियर कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे काम तिसऱ्या टप्प्यात होईल.