शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam Case) प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट भलेही सादर झाला असेल आणि त्यांना क्लीन चिटही मिळाली असली तरी, त्यांच्या अडचणी थांबताना दिसत नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी हा क्लोजर रिपोर्ट आणि क्लीन चिट यांवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर त्या विरोधात त्यांनी न्यायालयाही धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे. अण्णा आणि त्यांच्या वकीलाने घेतलेल्या आक्षेपामुळे आगामी काळ अजित पवार यांच्यासाठी अधिक संघर्षाचा असू शकतो, असेही बोलले जात आहे.
अण्णा हजारे यांचा आक्षेप कोर्टाकडून मान्य
अजित पवार यांच्याबद्दल सादर झालेल्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी घेतलेला आक्षेप कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आणि त्यांचे वकील माणिकराव जाधव यांना याचिका करण्यासाठी कोर्टानेच वेळ दिला आहे. या प्रकरणातील पुढची सुनावणी येत्या 29 जून रोजी होत आहे. शिखर बँक प्रकरण फार जुने आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रचंड टीका आणि आरोप झाले. त्यावरुन ते अडचणीतही आले. असे असले तरी प्रदीर्घ काळ चाललेल्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याही अडचणी वाढल्या होत्या. मात्र, क्लिन चिटनंतर दोघांनाही दिलासा मिळाला होता. (हेही वाचा, Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट )
तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा
प्राप्त माहितीनुसार, शिखर बँक घोटाळा तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा आहे. या प्रकरणात स्वत: अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील अडचणीत आल्या होत्या. त्याचा फटका अजित पवार यांच्या राजकारणालाही बसला. एकदा त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर अनेक वेळा जाहीर आरोपांना सामोरे जावे लागले. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (इओडब्ल्यू) केलेल्या तपासात त्यांना दिलासा मिळाला. या प्रकरणी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याने क्लिन चीट देण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगिले. पोलिसांनी या प्रकरणात जानेवारी महिन्यातच क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. दरम्यान, अण्णा हजारे यांनी आता या क्लोजर रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोर्टात धाव घेतल्याने पुढे काय होते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांची नेमका आक्षेप काय आहे ते समजू शकले नाही.