
जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे. आज पक्षाच्या बैठकीमध्ये या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा झाली आहे. शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेकजण हजर होते तेव्हा या नावाची घोषणा झाली आहे. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.
शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सुनील भुसारा यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर अमोल कोल्हे यांनीही अनुमोदन दिले आहे. शशिकांत शिंदे यांना पक्षाला मजबूत करण्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये चांगल्या कामगिरीची तयारी करावी लागणार आहे.
दोन टर्म जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा असा जाहीर मागणी केली होती. 10 जूनच्या पक्षाच्या मेळाव्यामधूनही शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी अशी मागणी केली होती. आज अखेर शरद पवारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदातून बाहेर पडलेले जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असताना त्यांनी मीडीयाशी बोलताना या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
जयंत पाटील यांची पोस्ट
माझे सहकारी, विधान परिषदेचे सदस्य श्री. शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणार्या पक्षाचा "सर्वसामान्य कार्यकर्ता" हा… pic.twitter.com/yDb9M9RUxP
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 15, 2025
कोण आहेत शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे मूळचे सातारा येथील आहे. सध्या पक्षाचे विधान परिषद आमदार आहेत. माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. अनेक महत्त्वाच्या निवडणूकीत शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत पक्षाकडून निवडणूकीचं तिकीट दिल आहे. शालिनीताई पाटील यांचा पराभव करत ते 2009 ते 2014 या काळात कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभव स्वीकारवा लागला होता.