विचारधारेने मी काँग्रेसी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा कट्टर निष्ठावान असलो तरी येणाऱ्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भगवाच फडकवू, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काढले आहेत. शिवसेना (UBT) खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी हे उद्गार काढले. तसेच, ठाणे महापालिकेवर भगवा फडकवणे हा आमचा शब्द आहे, असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा, लोकसभा आणि पालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांना काही महिन्यांचाच अवधी आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी काढलेल्या उद्गारामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. विचारे यांच्या वाढदिवसानमित्त ठाणे येथील काशिनात घाणेकर नाट्यगृहामध्ये आयोजित कार्यक्रमावेळी महाविकासाघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या वेळी ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात आव्हड बोलत होते.
राज्याच्या राजकारणात जे काही घडत आहे, ज्या पद्धतीने राजकीय पक्ष फोडले जात आहेत. सत्तास्थापन केली जात आहे ते लोक पाहात आहेत. जनतेला हे आवडलेले नाही. राज्यातील जनता प्रेमळ आहे पण ती सह्याद्रीच्या कड्यासारखीसुद्धा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ती या सर्वांचा विचार करेल. ठाण्यातील जनतेला आगामी निवडणुकीत पैशांचा महापूर येईल अशी भीती वाटतेआहे. पण, लोकांच्या मनात घाणेरड्या राजकारणाबद्दल ज्वालामुखी पेटला आहे. त्यामुळे ज्वालामुखीसमोर पैशांचे वारे भस्मसात होईल, असेही आव्हड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar Faction: शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीसा, घ्या जाणून)
जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरालगत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय समिकरणे प्रचंड बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी ठाण्यात अभेद्य ठेवण्याचे आव्हान शिवसेना (UBT), एनसीपी आणि काँग्रेस समोर आहेत. त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहेत.